Monday, July 19, 2010

भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत.. हिंदू धर्मातील अडगळ..

समाज हिंदुद्वेष्टे नेमाडे यांचा जावईशोध !

- मलिक अंबर हा ‘महाराष्ट्र धर्म’ स्थापन करणारा पहिला माणूस. आपण रामदासांचे नाव घेतो; पण ते काही खरे नाही. मलिक अंबरनेच शहाजी इत्यादींसारख्या मराठ्यांना सर्वप्रथम एकत्र केले आणि त्यातून मराठा धर्म पुढे आला. आज आपण हिंदु संस्कृती जगत असलो, तरी बौद्ध धर्मही पाळत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाची सारी तत्त्वे बौद्ध धर्मातूनच घेतलेली आहेत, असे अकलेचे तारे हिंदुद्वेष्टे लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी तोडले. नेमाडे यांचे ‘हिंदु : जगण्याची एक समृद्ध अडगळ’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने दैनिक ‘लोकमत’मध्ये त्यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यात त्यांची उपरोल्लेखित विधाने प्रसिद्ध झाली आहेत.
या मुलाखतीत नेमाडे पुढे म्हणतात, ‘‘आजोबा-पणजोबांपासून अनेक गोष्टी आपण सांभाळून ठेवलेल्या असतात. त्यामागे आपल्या भावना असतात. अगदी इथेही आपल्याकडे सज्जामध्ये सायकल असते, पाळणा असतो, अनेक वस्तू असतात. ती तशी अडगळच असते. हिंदु धर्मात तशी सगळी अडगळच झाली आहे आणि त्याला इलाज नाही.

कित्येक वेळा काही लेखक आधी गाजतात आणि मग अधिक गाजवले जातात. ते जे बोलतात, ते जणू ब्रह्मवाक्यच, अशा थाटात प्रसिद्धीमाध्यमे त्यांचा प्रसार करतात. त्यामुळे अशांना आपण विचारवंत वगैरे झाल्याचे भास होऊ लागतात. आपणच आपल्या धर्मावर टीका केली की, माध्यमे डोक्यावर घेतात, हे त्यांना नेमके ठाऊक असते. भालचंद्र नेमाडे हे त्यांतीलच एक.


हिंदु धर्मावर टीका करणार्‍यांना हिंदू विरोध करत नाहीत, हे दुर्दैव !
आपणच आपल्या धर्मावर टीका केली की, माध्यमे डोक्यावर घेतात हे लेखकांना नेमके ठाऊक असते. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टीका करणार नाहीत; कारण आपल्याच धर्मावर आपणच टीका केली की, बहिष्कृत होणे वा मार खावा लागणे हे दोनच पर्याय समोर असतात. याची त्यांना पक्की खात्री असते. हिंदूंचे तसे नसते! त्यामुळे हिंदू असूनही हिंदूंवरच आघात करणार्‍यांचे फावते. त्यांच्या लेखनावर वा बोलण्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटली की, ती करणार्‍यांना हे तालीबानी वगैरे संबोधून मोकळे होणार; पण पहिली खोड आपणच काढली, हे विसरणार. हे सर्व लिहिण्याचे कारण इतकेच की महाराष्ट्रातले थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या `हिंदू जगण्याची एक समृध्द अडगळ' नामक बृह्द कादंबरीचा पहिला भाग लवकरच प्रकाशित होत आहे.

हिंदु धर्मावर गरळ ओकणारे नेमाडे आणि त्याला प्रसिद्धी देणारी `स्टार माझा' वृत्तवाहिनी !

`स्टार माझा' नामक वाहिनीला २७ जून २०१० या दिवशी नेमाडेंनी दिलेली मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी जे तारे तोडले ते भन्नाटच होते. त्यांनी कौरवांना महाभारताचे नायक ठरवले आणि पांडवांनी महाभारत `हायजॅक' केल्याचे सांगितले. दुर्योधन हा जातीभेद न मानणारा पुरोगामी होता. (म्हणजे आजचे पुरोगामी म्हणवणारे त्याचे वंशज समजावे काय ?) राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ? कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता, अशी अनेक मुक्‍ताफळे त्यांनी उधळली. ब्राह्मण आणि हिंदुत्व पुढे नेऊ पहाणार्‍यांनी हिंदु धर्माचा नाश केला', या बोलण्यातून त्यांचा जातीद्वेषच दिसतो. ढीगभर नोट्स आणि टिपा काढलेल्या `फाइल्स' त्यांनी दाखवल्या. यात मूळ धर्मतत्त्वांचा अभ्यास किती याविषयी नक्कीच शंका येते. `स्टार माझा'नेही हिंदुत्वाची संकल्पना मोडीत काढणारी कादंबरी म्हणून नेमाडेंच्या कादंबरीची भलावण केली. अशा चोपड्या-कादंबर्‍यांनी धर्मतत्त्वे पालटत नसतात. ती शाश्‍वत असतात. हिंदु हा धर्म आहे. तो जगण्याचा मार्ग वा भौगोलिक संस्कृती एवढ्यात कोंबण्याचा प्रयत्‍न नको. नेमाडे, खरेतर तुमच्यासारखे लेखक हीच एक मोठी अडगळ आहे, जी बाहेर पडली तरी काही हानी होणार नाही.
(सौजन्य : दैनिक तरुण भारत (बेळगाव आवृत्ती), ४ जुलै २०१०) लेखक : राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे)