Tuesday, January 11, 2022

"रुतुजा" - एक प्रवास !!


--ती भेटली ! एका प्रवासात, एक कंटाळवाणा प्रवास तिच्या मुळे  आनंदमई झालेला. ती भेटली एका स्वप्नसुंदरी सारखी ! तिचे मनाला भुरळ घालणारे रूप, तिचे मोहक हास्य! पहिल्यांदाच वाटले तिच्याशी मैत्री करावी! मनातून वाटत होते स्वतः बोलावे, पण!  डोक्यातील तत्व मनातील वादळ क्षमावन्याचा केविलवाना प्रयत्न करीत होते. डोळ्यां समोर पेपर धरला, मन मात्र  केव्हाच तिच्याशी बोलू लागले होते.

मन चलबिचल होत होते, विचार येत होता किती वेळ शांत बसणार आपण? 
आणि--- आणि चमत्कारच झाला, गुलाबाच्या पाकळी सारखे तिचे ओठ अलगद विलग झाले, ती माझ्याशी बोलली, मी मात्र सुरवातीला चेहरयावर काहीच हाव भाव दाखवले नाही, मनावर कोठेतरी  खोलवर नकळत तृप्तता आली होती.

मनाला वाटत होते, ते घडत होते; विचारी घोड्यान्ना मनासारखा उत्तम सारथी लाभला होता! जुजबी विचारपूस झाली. त्यातून कळाले की ती विदर्भातली, नकळत विदर्भवासियां विषयी उस्तुकता निर्माण झाली.
तिने तिचे नाव सांगितले, निसर्गाला साद घालणारे, ऋतूंना जन्म देणारे, ऋतूंविषयी हेवा वाटावा, एवढे भाग्यवान का नाही, अस्से वाटणारे ! "रुतुजा", नावातच बरेच काही लपले होते.
ती निराश झालेली, कारण विचारल्यावर कळाले, की परिक्षेमधे कमी गुण,  तिची ही निराशा कशी दूर करावी हा विचार माझ्या मनात सुरु झाला. विचारी घोड्यान्ना सारथी मनाने त्या दिशेने भरदाव वेगाने फेकले, अहो विजेच्या चापल्यतेला लाजवनारा हा वेग, एक विचार मनात आला, योग्य ती जुळवणूक, करुन मांडला. "परिक्षेतिल गुण म्हणजेच यशाचा एकमेव मापदंड नव्हे "
एखाद्या विचारवंता सारखे आपण ही विचार करू शकतो, याचे समाधान वाटले. एवढ्या छोट्याश्या परन्तु परिणामकारक विचारामुळे  तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, क्षणभर तिचे ते मोहक हास्य मी पाहताच राहिलो.  "हळु  हळू का होईना, आमचे विचार कोणाला तरी पटतात! याचे समाधान वाटले. "
बऱ्याच विषयावर आमच्या गप्पा रंगत आल्या होत्या, सारथी उत्तम लाभल्यामुळे, विचारी घोड्यान्ना कसला ही त्रास होत नव्हता. विषय शिक्षणात गेला, मी इलेक्ट्रानिक्स चा विद्यार्थी आहे. हे कळल्यावर तिला ही आनंद झाला, कारण  ती पण याच विषयाची स्टुडेंट होती,  आणि हे ऐकल्या वर , माझ्याही अंगावर जरा मूठ भर मास चढले, आणि आमच्या गप्पा आणखी पुढे रंगु लागल्या.
नेहमी चे विषय चालू होते, पण आमचा विषय वेगळ्या विदर्भ राज्यावर घोंगावु लागला, प्रत्तेक गोष्टी मधे विदर्भ राज्यावर अन्याय झाला आहे, आणि विदर्भ वेगळे राज्य हवेच, असे तिला वाटत होते. माझ्या ही मनात मग मराठवाड्याविषयी विचार येवू लागले, पण वेगळ्या राज्यासाठी नव्हे कारण मराठवाडा महाराष्ट्रामधे सामील होण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी  दिलेल्या बलिदानाची मला जाण होती. (पण! ही वेळ च वेगळी होती ना! ;))
शेवटी मनातल्या मनात मी त्या स्वातंत्र्यसेनानी ची माफ़ी मागितली. आणि जे पश्चिम महाराष्ट्रा विषयी माझ्या तोंडातून उद्गार  निघू लागले ते थांबता थांबत  नव्हते,  थोड्यावेळ तर आपणही विदर्भवासी असल्याचे मला जाणवत होते. जसे काही मी एखाद्या मंत्रिमंडळा मधील मंत्री आणि ती विदर्भाची नागरिक,  माझा पुढे वेगळ्या विदर्भा चे प्रश्न मांडत होती (आणि एखाद्या राजकारण्याला लाजवेल अशा शब्दात  मी आश्वासन देवून देखिल टाकले ), तिच्या चेहऱ्या  वर पुन्हा स्मितहास्य परतले, यावेळी , तिच्या गालावर पडलेल्या खळी  कडे मी बघतच राहिलो.
बसने जवळपास शे-सव्वाशे किमी अंतर पार केले होते. बस थोड्या वेळासाठी एका ढाब्यावर  थांबली, तिला चहा-कॉफी साठी  विचारले, थोड़े  आढे -वेढे  घेतल्यावर ती तयार झाली,  तिची आवड निवड कळाली आणि खूप झालेल्या आनंदात साखर पडल्या सारखेच झाले कारण तिच्या आणि माझ्या आवड निवडी जवळपास सारख्याच होत्या (अथवा जुळवून  घेतल्या म्हणा ना). मग थोडी चित्रपटाविषयी चर्चा झाली आणि चित्रपटामधे काय काय सुधारना घडवाव्यात याची एकमेकांसमोर मते मांडली. (जशे काय आम्हीच निर्माता-दिग्दर्शक आहोत.)
एखादी धावती रेल्वे जसा हळूच रूळ बदलावी त्याप्रमाणे आमच्या गप्पा एका विषयावरून दुसऱ्या  विषयावर अलगद पुढे जात होत्या, बोलण्यावरून याची जाणीव तर झालीच कि ऋतुजा एक सुंदर मुलगीच नाही तर उत्कृष्ट वक्ता देखील आहे. चित्रपटांवरून अलगद तिने विषय केव्हा आय.पी.एल. वर नेला आणि कधी आम्ही क्रिकेट विषयी गप्पा सुरु केल्या हे माझे मलाच कळाले नाही. आय.पी.एल मुळे खऱ्या  क्रिकेटचा आनंद कसा आपण हरवून बसलो आहोत हे तिने तिच्या शब्दात तिचे परखड मत व्यक्त केले. तिचे अखंड बोलणे थांबवावे अशी माझी अजिबात इच्छा  नव्हती. कॅडबरी खाताना मधेच त्या कॅडबरीचे जेल जसे जिभेवर एक सुखद चव देऊन जाते तसे तिचे बोलतानाचे मोहक हास्य मनाला हळूवार थंड हवेचा स्पर्श करून गेल्या सारखे भासत होते.हसल्यावर मुली सुंदर दिसतात हे ठावूक होते पण काही मुली चिडल्यावर किती सुंदर दिसतात याचे मला थोडे कौतुक वाटले. चिडल्यावर तिच्या गालावर आणि नाकावर लाल छटा  उमटल्या होत्या.  मनोमन मी ब्रह्मदेवाचे आभार मानले. (ते कशा करता हे स्पष्ट करायची गरज नाही), क्रिकेट मध्ये होणारी फिक्सिंग आणि यावरून आमचा विषय पुढे भ्रष्टाचारावर गेला, आणि इथे विदेशामध्ये दडवलेला काळा पैसा देशामध्ये कसा आणावा यावर चर्चा झाली. 
मनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, आपले गाव जवळ येण्याची, असे वाटत होते की हा प्रवास अखंड पणे सुरु रहावा, शेवटी मी तिला सांगितले की मी औरंगाबाद ला उतरत आहे, तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी पटकन ओळखले, माझ्या लक्षात आले की ती थोडीशी भावनिक होणार, पण मी तिचा पत्ता घेवून या नवीन वर्षाला शुभेच्चा पत्र पाठवनयाचे कबूल केले.
तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात झालेली मैत्री कित्तेक वर्ष जुनी, तरी ही सदाबहार वाटत होती, मी तिला म्हणालो, "रुतुजा, प्रवासात भेटलेले सहप्रवासी पुन्हा भेटतात की नाही मला माहित नाही, परत जर भेटलो तर ओळख ठेव." ती म्हणाली,"अरे असे काय म्हणतोस, पुन्हा आपण नक्कीच भेटू, आणि मी तुला माझा ईमेल आय.डी.  देत आहे ना!" असे अत्यंत भावनिक चेहऱ्याने ती म्हणाली.
प्रवास संपला! एक क्षण भर मी तिच्या भावनिक चेहऱ्याकड़े बघत होतो. हातात हात घालून निरोप घेतला, हात सोडताना कोणीतरी जवळचे सोडून जात आहे, असा भास् होत होता, बराच वेळ  ती हात दाखवत बस च्या दारा मध्ये उभी होती, बस धुराडा उडवत तिच्या वाटेने निघून गेली, मी माझ्या वाटेने निघालो, मनात एकच विचार येत होता, ती मला पुन्हा भेटेल? आमच्या वेगळ्या झालेल्या वाटा पुन्हा एकत्र येतील? तिचा तो प्रसन्न चेहरा, सारखा डोळ्या समोर येत होता, डोळे मिटले, आणि स्वत:च स्वत:ला म्हणालो, "रुतुजा"!

मन जुळत असताना
मन मोडून गेलीस
तुझे माझे नाते नसताना
नाते जोडून गेलीस
भेटीस अधीर असताना
अति दूर निघून गेलीस !


काल्पनिक?



क्रमश :