Showing posts with label स्वामी .. Show all posts
Showing posts with label स्वामी .. Show all posts

Thursday, December 23, 2010

स्वामी



"माझा" भारत हि संतांची भूमी आहे, या भारताच्या कोणत्या न कोणत्या भागात अनेक संत होवून गेले. एखाद्या प्रकल्पाला छोटीशी भेट द्यावी, त्यांना मार्गदर्शन करावे, आणि मग जगाचा निरोप  घ्यावा. असे अनेक संत होवून गेलेत ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या कमी अवधी मध्ये समाज-प्रबोधन केले. संत ज्ञानेश्वर हे त्यातले आपल्याला सर्वात परिचित नाव. पण अलीकडल्या काळातील सर्व जगाला आपल्या वाणीने भुरळ घालणारे एक नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. लहानपणी चा  नरेंद्र असो अथवा शिकागोच्या जागतिक परिषदेत सर्व जगाला आपले मित्र करणारा स्वामी, या भारताच्या प्रत्तेक युवा पिढी ला मार्गदर्शन करणारे  नाव म्हणजे विवेकानंद अर्थातच नरेंद्रनाथ दत्त, सद्य भारतीय संस्कृतीला काही नवीन नाही. 
       जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते, सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नरेंद्र नाथांनी नकार दिला होता. डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इ. विचारवंतांचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सर च्या ‘Education’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता.
२५ वर्षाच्या वयात त्यांनी सर्व भारत यात्रा केली. १८९३ मधल्या विश्वधर्म परिषदेसाठी त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्याकाळी अमेरिका आणि युरोप मधले लोक भारतीयांना हीन दृष्टीने बघत होते. पण स्वामीजींच्या पहिल्या दोन शब्दानेच त्या लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांची वकृत्वशैली आणि ज्ञान यामुळे त्या काळी तिथल्या मिडिया ने त्यांना साइक्लॉनिक हिन्दू हे नाव ठेवले होते. विवेकानंद हे नाव त्यांना खेत्री चे महाराजा व त्यांचे मित्र  अजितसिन्हांनी दिले.
         विवेकानंदांनी आपले सर्व आयुष्य त्यांच्या गुरुचरणी म्हणजे रामकृष्ण परमहंस यांना समर्पित केले होते. नोव्हेंबर १८८१ मधली त्यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. देवाचा शोध घेणाऱ्या नरेंद्र ने जेव्हा त्यांना प्रश्न  केला, कि "तुम्ही देवाला पहिले का"? आत्ता पर्यंत खूप जनांकडून "नाही" हे उत्तर मिळणाऱ्या नरेंद्र ला इथे "हो" असे उत्तर मिळाले. "मी जसे तुला इथे बघतोय, तसेच मी देवाला सुद्धा, फक्त त्याला बघण्या साठी एक मनामध्ये भाव असावा लागतो". कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्याआधी त्याचे परीक्षण करण्याची जी नरेंद्रला सवय होती, यामुळे त्याने आधी परमहंसांचा गुरु म्हणून पूर्णपणे स्वीकार नाही केला. परमहंसांनी सुद्धा कधीच नरेंद्रच्या प्रश्नांना आणि त्याच्या त्या परीक्षेला दुर्लक्षित केले नाही, अत्यंत शांत पणे ते त्याच्या शंकांचे निरसन करत होते. या सर्व प्रश्नांना; ते शांत पण उत्तराची सुरुवात करायचे, कि "सत्याला चाहु बाजूने बघण्याचा प्रयत्न कर".  त्यांच्या कडील ५ वर्षाच्या शिक्षणाने देवाला शोधणारा, आणि बालिश असा हा नरेंद्र एक परिपक्व युवा मध्ये रुपांतरीत झाला. सबंध मानव सेवा हाच खरा धर्म आहे याची शिकवण त्याला नेहमी दिली गेली. एकदा परमेश्वराच्या अवतारा बद्दल नरेंद्र शंका घेऊ लागला तेव्हा, परम हंसांनी त्याला असे उत्तर दिले, "तो जो राम आहे, जो कृष्ण आहे, ते स्वतः आता "रामकृष्ण" या नावाने  माझ्या शरीरा मध्ये आहेत". 

           एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता लहानपणापासूनच नरेंद्रामध्ये होती. नरेंद्र आणि त्याचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून मित्र  येऊन पहातात तो काय ? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसलेला! साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. इतके त्याचे मन एकाग्र झाले होते.
          एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात् नरेंद्र दत्त होता ! तेथील अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. `हे त्यांना कसे जमले', या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवेकानंदांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.
            असो, आज त्यांच्या गोष्टी सांगायला गेले तर खूप आहेत, आज विवेकानंद हा विषय काढायचा उद्देश फक्त एवढाच कि आज युवा दिन आहे, आणि विवेकानंदांचा जन्म दिन. आपल्या आयुष्या मध्ये आपल्याला योग्य वेळेवर मार्गदर्शकाची नितांत गरज भासते,  समोर असंख्य चीत-परिचित वाटा असतात, मनामध्ये खूप शंका असतात, काही जणांना तो मार्गदर्शक लवकर उदमगतो, काही जन शेवटपर्यंत त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. ज्यांना तो मार्गदर्शक उदमगतो, त्यांना त्यांचे कार्यही लवकर ज्ञात होते. आणि ते मग ते कार्य पूर्णत्वाला नेण्यास धडपड करत राहतात. आणि शेवटी ज्या प्रश्नांचे उत्तर ते शोधात असतात, तेच उत्तर ते स्वतःच मग जगाला सांगतात. कारण याच मार्गात त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळते. लहान असताना देवाला शोधणारा नरेंद्र जाताना सांगून गेलाच ना , SERVE MAN, SERVE GOD, हो ना? 
-अभिजीत