Tuesday, November 22, 2011

नदी काठची शहरे



"जिथे पाणी आहे, तिथे जीवन आहे", या वाक्याला अनुसरून विचार केला तर असे कळेल कि सद्य परिस्थिती मध्ये फक्त पृथ्वी वरच पाणी आहे, आणि अर्थातच जीवन. अतिशय मुबलक प्रमाणा मध्ये गोड्या पाण्याचे अस्तित्व या वसुंधरेवर आहे, ते मग नदीच्या स्वरुपात आणि काही प्रमाणात जलाशयाच्या स्वरुपात अस्तित्वात आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे दिसून येईन कि जगातील सर्व संस्कृतींचे अस्तित्व हे या गोड पाण्याचा साठ्या जवळ सामावलेले आहे, मग ते जगातील सर्वात जुन्या आर्य संस्कृतीचे असो अथवा ग्रीको रोमन संस्कृतीचे. आर्य संस्कृतीचा विचार केला तर या संस्कृतीने नद्यांना एक देवाचे स्वरूप दिलेले आहे, कारण त्यांच्या वरच मानवाचे अस्तित्व अवलंबून आहे. मानवाने अमुक अमुक ठिकाणी एखादे शहर वसवले असे म्हणण्या पेक्षा या नद्यांनी मानवास त्यांच्या सुपीक प्रदेशा मध्ये वसवण्यास भाग पडले असे म्हणावयास हरकत नाही. एवढेच काय तर देवभूमी अर्थात इंडिया - हिंदोस्तान हे नाव सुद्धा इंडस -सिंधू नदीवरून पडले आहे.
ज्या नदीच्या ठिकाणी असे शहर वसले त्या ठिकाणी मग त्या परिसराचा विकास सुरु होतो आणि सागर मंथन केल्या प्रमाणे एक एक रत्न मग त्या भागातून बाहेर येत राहते आणि साऱ्या जगाला दिपवून जाते.  आज आपण पहिले तर जगामध्ये सर्वात प्रगतीशील अशी शहरे या नद्यांच्या तीरावर वसलेली आहेत. अशा जगातल्या आधुनिक आणि जलद प्रगती करणाऱ्या ७ शहरांना आज आपण बघणार आहोत, जी सर्व नदी किनारी वसलेली आहेत.
            तर मग श्रीगणेशा करूयात पुण्या पासून, तसे पहिले तर गणपती बाप्पाच नाव काढले कि आधी आठवते ते पुणे, कारण याच शहरात टिळकांनी गणेशोत्सवाची रुजुवात केलेली होती.हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून , नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' आणि विद्येचे माहेरघर. पुणे शहर उद्दोग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.
            आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती.  शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्याकाळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.
        भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासून नामांकित होतेच.
पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. पुण्यात शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकर देखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IIUCA), आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (ARI),सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes),कांदा आणि लसुण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतिय विज्ञान आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA),वणस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), भलीमोठी मीटरवेव रेडिओ दुर्बीण (GMRT) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
धर्म व अध्यात्म बद्दल बोलायचे झाल्यास, चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते.दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरात वारी पोहोचते.पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. प्ण्यात ओहेल डेविड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.

औद्योगिक क्षेत्रामधील गरुडझेप 

पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स ,अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थर्मेक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तुनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्‌मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जियोमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यु.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्त्वाच्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.


पुण्यातील महत्त्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -
बजाज ऑटो लिमिटेड
कमिन्स इंडिया लिमिटेड
बॅंक ऑफ महाराष्ट्र
पर्सिस्टंट सिस्टम्स
नीलसॉफ्ट


कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्स,इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आयबीएम,कॉग्निझंट सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
      १० वर्षांपूर्वी पेन्शनर्स पुणे म्हणून ओळखणारे पुणे आज यंग पुणे म्हणून संबोधले जाते ते इथे शिक्षण घेत असणाऱ्या तरुणाई मुळे. पुण्याचे नाव आले म्हणजे पुणेकर सुद्धा येणार आणि त्या पाठो पाठ येणार पुणेरी पाट्या, जी आज पुण्याची एक प्रमुख ओळख बनेलेली आहे.


बीजिंग
बी = उत्तर , जिंग =राजधानी 
उत्तर पूर्वे कडे योंगदिंग आणि चावोबाई नदीच्या किनाऱ्या वर वसलेले, आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात महत्वाचे शहर म्हणजे बीजिंग.बीजिंग हे चीनचे सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे.बीजिंग ची लोकसंख्या ७६ लाख च्या घरात आहे, जवळ पास चे उपनगर मिळून बीजिंग ची लोकसंख्या १ करोड ७६ लाख आहे. १९८९ ला त्यानमेन चौकात चीनी कॉमुनिस्त राजवटी विरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या राजवटीने रणगाड्या खाली ठेचून मारले होते.  मात्र याच शहराला चीनची लॅन्डस्केप व फुलांची राजधानी असेही म्हटले तरी आश्चर्य मुळीच वाटू नये. दरवर्षी बीजिंगला लाखो प्रवासी भेट देतात आणि या शहराचे लँडस्केप व विविध रंगांनी फुललेल्या फुलांचे सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध होतात. फुलासाठी युरोपमधील हॉलंडची राजधानी अ‍ॅमस्टरडॅम हे शहर सुंदर बागा आणि लँडस्केपसाठी लंडन हे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या दोन अनोख्या वनस्पती विश्वांना एकत्र आणून निसर्गाची हिरवी व त्यात सामावलेली विविध रंगांच्या फुलांची उधळण अख्ख्या शहरात पाहावयाची असेल तर पाना-फुलांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी बीजिंग या चीनच्या राजधानीस भेट ही द्यावयास हवीच.बीजिंग हे १८ दशलक्ष लोकसंख्येचे शहर आज ४० दशलक्ष फुलांच्या रोपांनी लगडलेले आहे व त्यावर २२ दशलक्ष हिरव्या सुरेख वृक्षांचा खजिना हा वेगळाच. प्रत्येक बीजिंग निवासी नागरिकामागे आजमितीस कमीत कमी एक वृक्ष व दोन फुलझाडे आहेत.हे शहर पाच गोलाकार रस्त्यांनी वेढलेले आहे. हे सर्व १२ पदरी रस्ते (६+६) एक दिशा वाहतूक करतात. दुतर्फा प्रत्येकी तीन छोटे रस्ते वेगळेच. याच दुतर्फा लेनमध्ये असंख्य वृक्ष ठराविक अंतरावर ओळींनी सैनिकासारखे शिस्तीने उभे दिसतात. प्रत्येक वृक्ष १० ते २० फूट सरळ व वर टोकाला पसरलेल्या हिरव्या पानांनी भरलेल्या सरळ फांद्या. बहुतेक सर्व वृक्ष गिरीपुष्प कुळातले, काही ठिकाणी Pawlownia, Phonix, Firtune free व Poplar वृक्ष ही सुरेख पद्धतीने लावलेले आढळले.Scholar Tree व Oriental Cypress हे त्यांचे मुख्य वृक्ष, पण यांची संख्या नवीन वृक्षारोपणात कमी आढळत होती. मात्र फायकस काळातील पिंपळासारखे काही वृक्ष २० ते २५ फूट पारंबीविना सरळ वाढलेले पाहून आपण आश्चर्यचकित होतो. प्रत्येक वृक्षास रस्त्यावर लावण्यापूर्वी नर्सरीमध्ये विशेष काळजीने व शास्त्रीय पद्धतीनेच वाढविण्यात येते हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एकही वृक्ष वाकडा नाही अथवा झुकलेलासुद्धा नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वृक्ष, वेली, फुलांच्या बागा, कुंडय़ा, हिरवळ व लॅण्डस्केप यांना लागणारे पाणी कुठून उपलब्ध होणार? बीजिंगमध्ये पाण्याची कमतरता होणार या पर्यावरणवाद्यांच्या आरडाओरडीवर बीजिंग महानगरपालिकेने सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी जमिनीखालून पाईपने प्रत्येक ५०० मीटर अंतरावर बाराही महिने उपलब्ध करून देऊन टीकाकारांना पर्यावरणाचा एक धडाच शिकवला आहे.
        बीजिंग हे औद्योगिक दृष्ट्या चीनमधील सर्वाधिक विकसित शहर आहे ज्याचा जीडीपी ७३.२ % आहे. बीजिंग मध्ये २६ fortune 500 global company आहेत आणि १०० लहान मोठ्या. टोकियो आणि प्यारीस नंतर बीजिंग चा औद्योगिक दृष्ट्या ३ रा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षात बीजिंग ने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. बीजिंग हे मुख्यतः जाणले जाते ते इथे नवीन सुरु होणाऱ्या उद्योगामुळे आणि त्यात मिळणाऱ्या यशामुळे. चीनमध्ये नवीन उद्यागाचा पाया घालायचा असेन तर बीजिंग कडे एका वेगळ्या आशेने बघितले जाते. पण अतिशय विकसित होणाऱ्या उद्योगामुळे आणि या शहराच्या विस्तारामुळे नवीन नवीन समस्येला या शहराला तोंड द्यावे लागते, वाहतुकीमुळे होणारी गर्दी हे इथले प्रमुख समस्या पैकी एक आहे. आणि जसे बीजिंग मोठ्या कंपनी मुळे जाणले जाते तसेच हे पायरेटेड वस्तूंचे हे एक मुख्य केंद्र आहे.






मॉस्को


मोस्कवा नदीच्या तीरावर वसलेले मॉस्को ही रशिया देशाची राजधानी व ते त्या देशातले सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत. मॉस्को शहरात बाहेर पडणे, हेच एक पर्यटन म्हणायला हरकत नाही. तेथील भुयारी रेल्वे, बेसिल्स चर्च, हिरवीगार शेते व फुलांनी डवरलेल्या बागा पाहताना हरखून जायला होते. मॉस्कोच्या प्रसिद्ध अंडरग्राउंड मेट्रो रेल्वेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. संबंध मॉस्को शहर जोडणाऱ्या या मेट्रो रेल्वेचा नव्वद टक्के भाग हा "भुयारी' आहे. फारच कमी ठिकाणी ती जमिनीवरून धावते, तर मॉस्को (मस्कव्हा) नदी ओलांडताना ती पुलावरून जाते. या रेल्वेचे प्रत्येक स्थानक हे स्थापत्त्यशास्त्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण सुंदर नमुना आहे. गुळगुळीत प्लॅटफॉर्मवरील संगमरवरी मजबूत खांब, त्यावरील अर्धकमानीवर असणारी सुंदर नक्षी, आकर्षक झुंबर, कुठे रंगीत स्टेन ग्लासचं नक्षीकाम, मोझॅक टाईल्सची सुंदर नक्षी, शिल्पं, नामवंत कलाकारांची देखणी, भव्य चित्रं यांनी सजलेली स्वच्छ स्थानकं दृष्ट लागण्यासारखी आहेत. एकट्या मोस्को शहरामध्ये ९६ बागा, १८ उद्याने आणि ४ वनस्पती उद्याने आहेत. सर्व युरोपे मध्ये या सारखे हिरवे शहर नाही.


रशियाच्या सर्वात मोठ्या औद्योगिक शहरांपैकी एक मोस्को शहर आहे, देशाच्या एकूण जीडीपी मध्ये मोस्को चा २२% वाटा आहे.देशाच्या ७ % बेरोजगारा पैकी फक्त १ % बेरोजगार दर (सर्वात कमी) येथे आहे, मुख्य करून मोस्को मध्ये रासायनिक, जैविक, संगणक, खाद्य, उर्जा नवनिर्माण,अशे उद्योग आहेत. या व्यतिरिक्त रुशिया हा सैन्य शस्त्र मध्ये आणि अंतराळ संशोधनामध्ये मुख्य पुरवठादार देश असल्यामुळे बऱ्याच मुख्य उद्यागांचे कार्यालय याच शहरामध्ये आहेत. जसे Mir, ISS ,Proton launch vehicles and military ICBMs. Sukhoi, Ilyushin, Mikoyan, Tupolev and Yakovlev विमान निर्माण उद्याग. गाझ्प्रोम या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक तेल उत्खनन उद्याग समूहाचे मुख्य कार्यालय मोस्को मध्ये आहे.


लंडन :

लंडन हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्याकाठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यू यॉर्क शहर व टोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते. तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो. जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या जातील. ह्या स्पर्धांचे तिसर्‍यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर असेल.
उच्च शिक्षणाचे लंडन हे जगातील एक महत्वाचे केंद्र आहे. लंडन महानगरामध्ये एकूण ४३ (युरोपात सर्वाधिक) विद्यापीठे कार्यरत आहेत. २००८ साली ४.१२ लाख विद्यार्थी लंडनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. १.२५ लाख विद्यार्थीसंख्या असलेला लंडन विद्यापीठ हा युरोपातील सर्वात मोठा विद्यापीठसमूह आहे. लंडन विद्यापीठामध्ये १९ स्वतंत्र उप-विद्यापीठे व १२ संशोधन संस्था आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इंपिरियल कॉलेज लंडन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन व्यापार विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था अनेक अहवालांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट संस्था असल्याचे आढळून आले आहे.
              एका काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. त्या काळी सर्व जगातील राजकीय आणि आर्थिक घडामोडीचे नियंत्रण लंडनहून होत असे. युद्धात जिंकलेली लूट, मांडलिक राजांच्याकडून घेतलेली खंडणी आणि व्यापारातला नफा अशा अनेक मार्गाने जगभरातल्या संपत्तीचा ओघ लंडनच्या दिशेने वहात होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेतला कांही भाग त्या नगरीच्या बांधणीमध्ये खर्च झाला आणि त्यातून तिथले विशाल प्रासाद आणि कलात्मक टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या असतील. राजधानीचे शहर म्हणून तर लंडनचा दिमाख होताच. जागतिक व्यापाराचे केंद्र असल्यामुळे जगभरातील व्यापारी त्या शहराला भेट देत होते, त्यांनी आपल्या कंपन्यांची ऑफिसे तिथे थाटली. उच्च शिक्षणासाठी जगभरातले विद्यार्थी तिथे येऊन रहात होते. मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार वगैरेंनी लंडन ही आपली कर्मभूमी बनवली आणि तिचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. शंभर वर्षांहून अधिक काळ लंडन ही जगातल्या सा-या महानगरींची महाराणी होती असे म्हणता येईल.
लंडनचा इतिहास देखील रोमइतकाच जुनापुराणा आहे. पण प्राचीन काळात त्या शहराला विशेष महत्व नव्हते. रोम या शहराचे नांव कसे पडले याबद्दल दुमत नाही, पण लंडन शहराच्या नांवाची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली याबद्दल दहा संशोधकांची दहा निरनिराळी मते दिसतात. जगभरात सगळीकडे प्राचीन कालापासून नद्यांच्या कांठावर वस्ती करून माणसे रहात आली आहेत. त्यांच्या आपसातील लढाया, लुटारूंचे हल्ले, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या वस्त्या उजाड झाल्या आणि नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. थेम्स नदीच्या कांठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात मानवांनी वस्त्या निर्माण केल्या होत्या. मध्ययुगाच्या काळात युरोपखंडातल्या सगळ्याच देशांचा झपाट्याने विकास झाला आणि या क्रांतिकारक प्रगतीमध्ये ब्रिटन आघाडीवर राहिला. त्या देशाने युरोपमधला कोठलाही दुसरा भाग जिंकून घेतला नाही, पण आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांतले प्रचंड भूभाग आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व कालखंडात ब्रिटनची राजधानी लंडन येथे असल्यामुळे ते जगातील अव्वल क्रमांकाचे शहर झाले.
लंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत 'ट्यूब' ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डशनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे प्रत्यक्षात त्या एकमेकींना कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो.

लंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात प्रवाशाला इच्छित स्थळी पोचता येते.
     देशाच्या एकूण जीडीपी पैकी लंडन शहराचा वाटा २०% आहे, लंडन हे जगातील महत्वाचे आर्थिक केंद्र आहे आणि येथे याच उद्योगाचे अस्तित्व जास्त आहे, ३,२५,००० नौकारदार या मध्ये गुंतलेले आहेत. 500 fortune company पैकी ७५ % उद्योगांचे कार्यालय लंडन मध्ये आहे.


न्यू योर्क 


हडसन नदीच्या किनार्यावर वसलेले न्यू यॉर्क हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर व जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगराचा भाग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय असलेले हे शहर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे.
न्यू यॉर्क शहराची मूळ स्थापना सन १६२४ मध्ये डच लोकांनी एक व्यापारी शहर म्हणून केली. स्थापनेवेळी डच लोकांनी त्याचे नाव 'न्यू अॅमस्टरडॅम' असे ठेवले होते. १६६४ साली शहर इंग्लिश वसाहतकारांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नामकरण न्यूयॉर्क करण्यात आले. सन १७८५ पासून ते सन १७९० पर्यंत अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क ही होती.न्यू यॉर्क अमेरिकेच्या व जगाच्या आर्थिक जगताचे प्रमुख केंद्र आहे. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज व नॅसडॅक हे अमेरिकेतील हे प्रमुख शेअर बाजार न्यू यॉर्कमध्ये आहेत. अनेक महत्वाच्या सांस्कृतिक चळवळींचा उगम न्यू यॉर्कमध्ये झाला. त्याचप्रमाणे हॉलिवूडनंतर अमेरिकीतील मोठा चित्रपट व टेलिव्हिजन उद्योग न्यू यॉर्क येथून चालतो. ब्रॉडवे ही नाट्यसंस्था येथे आहे. न्यू यॉर्कची नागरी सार्वजनिक वाहतूक संस्था ही जगातील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम नागरी वाहतूक संस्थांमध्ये गणली जाते.
न्यूयॉर्क शहरातील अनेक ठिकाणे ही जगप्रसिद्ध पर्यटण आकर्षणे आहेत , उदा. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, टाइम्स स्क्वेअर, एम्पायर स्टेट बिल्डींग. न्यूयॉर्क शहर त्यातील अनेक गगनचुंबी इमारतींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात एंपायर स्ट्रीट बिल्डिंग, (२००१ च्या अतिरेकी हल्ल्यात पडलेले) वर्ल्ड ट्रेड सेंटर, क्रायस्लर बिल्डिंग ह्यांचा समावेश आहे.एकादी मोठी नदी समुद्राला मिळते त्या जागी तिच्या प्रवाहाचे अनेक भाग होतात आणि वेगवेगळ्या वाटांनी जाऊन समुद्राला मिळतात. त्यामुळे त्या भागात पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी या प्रवाहांत शिरून जमीनीची झीज घडवते आणि तिथली दगडमाती ओढून नेते. यातून अनेक लहान लहान खाड्यांचे जाळे तयार होते, तसेच सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले अनेक लहान लहान भूभाग तयार होतात. अशा बेटांच्या आडोशाला बोट उभी केली तर त्याला समुद्रातील लाटा आणि तुफानी वारे यापासून थोडे संरक्षण मिळते. न्यूयॉर्क हे हडसन नदीच्या मुखापाशी अशाच प्रकारे तयार झालेले एक नैसर्गिक बंदर आहे. तिथल्या समुद्रात अनेक लहान लहान बेटे आहेत. त्यातल्याच एका बेटावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केला आहे. त्या बेटापासून जवळच हे एलिस बेट आहे. न्यूयॉर्क बंदरावर तैनात असलेल्या सैनिकांकडेच या सगळ्या बेटांच्या संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळे त्यांचा अंतर्भाव न्यूयॉर्क या शहरात आणि राज्यात करण्यात आला. पिटुकल्या न्यूजर्सीच्या मानाने बलाढ्य असलेल्या न्यूयॉर्कने ती सारी बेटे आपल्या ताब्यात ठेऊन घेतली आहेत.
     न्यू योर्क हे जगातील ३ आर्थिक केंद्रापैकी एक आहे, बँकिंग, आर्थिक, विमा, माहिती तंत्रज्ञान, इत साठी मुख्य व्यापार केंद्र आहे. या शहरामधील टीवी आणि फिल्म उद्योग हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगसमूह आहे, होली वूड  नंतर. बायोटेक , माहिती तंत्रज्ञान, आणि इंटरनेट हे उद्योग सुद्धा इथे वाढत आहेत.न्यूयॉर्कच्या वाल स्ट्रीट या लहानशा भागातून अमेरिकेचीच नव्हे तर सगळ्या जगाची आर्थिक सूत्रे हलवली जातात असे समजले जाते. वॉल स्ट्रीटवरील बाजारात समभागांचे भाव वधारले किंवा कोसळले तर त्याचा परिणाम टोक्योपासून लंडनपर्यंत मुंबईसकट सगळ्या शेअरबाजारांवर होतो. असो जशी मागे आर्थिक मंदीची गंगा वाहिली तशीच आता प्रगतीची पण वाहू आणि सर्व जगात एक सबंध समतोल आर्थिक सत्ता येवो.

टोकियो


ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर हे सुमिदा या नदीच्या तीरावर  वसलेले आहे. टोकियो  हा जपानमधील ४७ पैकी एक प्रभाग (प्रभाग), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
टोकियो  महानगरीय प्रभागामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकुण ३९ महानगरपालिका ह्या प्रभागाच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. न्यूयॉर्क व लंडन सोबत टोकियोचे  जगातील तीन आर्थिक महासत्ताकेंद्रे असा उल्लेख केला गेला आहे.जपानमध्ये लोहमार्गाचे सर्व दळणवळण प्रकार सारख्याच ताकदीने चालू असतात. जमिनीवरून चालणारे जपान रेल्वे लाईन्सचे जाळे मोठय़ा शहरांमध्ये, जमिनीखाली वसलेले सबवे किंवा मेट्रो रेल्वेचे जाळे व जपानच्या पूवरेत्तर टोकापासून नागासाकी या नैऋत्येकडील टोकापर्यंत जाणारे शिनकानसेन अर्थात बुलेट ट्रेन मार्ग सेवेला तत्पर असतात. ऑफिसच्या वेळामध्ये या सर्व मार्गावर प्रचंड गर्दी असते, परंतु या गर्दीतही शिस्त, संयम व वक्तशीरपणा ही जपानी लोकांची वैशिष्टय़े उठून दिसतात.
प्रचंड संख्येने, प्रचंड लगबगीने परंतु मुंग्यांच्या शिस्तीने लोकांची ये-जा चालू असते. सुटाबुटातील इतकी माणसे एकाच वेळी पाहायची सवय नसल्याने आपल्याला एक प्रकारचा वेगळेपणा जाणवत राहतो. गर्दीच्या वेळी फलाटावर लोक वेगवेगळ्या रांगा लावतात व रांगेनेच गाडीत चढतात. लोक गाडीत चढल्याची खात्री झाली, की गाडीचे दरवाजे बंद होतात.सबवे किंवा जमिनीखालील मेट्रोचे जाळे हे टोकियोमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळले. टोकियोमध्ये १२ मेट्रो मार्ग आहेत, शहराच्या आठही कोपऱ्यांमध्ये जा-ये करता यावी, अशी साधारणपणे त्यांची रचना. मेट्रोच्या नकाशावर या १२ मार्ग वेगवेगळ्या रंगांत दर्शवलेल्या असतात. एकदा हा नकाशा समजून घेतला आणि मेट्रो स्थानकाची अंतर्गत रचना समजून घेतली, की तुम्ही टोकियोत फिरायला तयार झालात. या दृष्टीने सबवे मार्ग हे लंडनची टय़ूब किंवा पॅरिसची मेट्रो याच्या जवळ जाणारे आहेत, पण टोकियोचा मेट्रो पसारा शहराच्या आकारामुळे व लोकसंख्येमुळे जास्त मोठा वाटतो. एकमेकांना छेद देणाऱ्या अनेक मेट्रो मार्गामुळे शिन्जुकु, उएनो, शिम्बाशी ही स्थानकं ‘जंक्शन’ म्हणून गणता येतात. ही जंक्शन्स म्हणजे मुख्य शहराच्या पृष्ठभागाखाली वसवलेली मिनी मेट्रो नगरंच असतात. शॉिपग मॉल्स, उपाहारगृहे, पुस्तकाची दुकानं, इतकंच काय, आर्ट गॅलऱ्या पण इथे आहेत. नवख्या प्रवाशाला शॉिपगचा मोह आवरता येणे कठीण. काही स्थानकांवर ही शॉिपग संकुलं म्हणजे उंच उंच इमारती आहेत. टोकियोमधील ‘ओ-इडो’ नावाची मेट्रो मार्ग ही ‘रिंग रूट’ (म्हणजे शहरात गोल फिरणारी) मार्ग आहे व या मार्गवर ही सर्व मोठी जंक्शन्स वसलेली आहेत.   टोकियो मध्ये  Global 500 पैकी ५१ कंपन्या आहेत. टोकियो हे जगातील सर्वात मोठे आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे, आणि जगातील सर्वात महागडे शहर.


कॅनबेरा 


कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी असून मोलोन्गलो नदीच्या तीरावर वसलेले आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात ऑस्ट्रेलियाची संसद, पहिले महायुद्ध प्रदर्शन, नाणी पाडणारी टांकसाळ, विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच कॅप्टन कुक च्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हेरेल्वे, बस तसेच विमान सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रूप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.हिवाळा हा कॅनबेरामधला सर्वात आवडता ऋतू. या काळात तिथल्या लोकांचे सूट, कॉपोर्रेट ड्रेसेस, स्त्रियांचे हाय हिल्स हे सगळे पाच दिवसांसाठी कपाटात जातात. याचं कारण म्हणजे, तिथे साजरा होणारा कॅनबेरा नॅशनल फोक फेस्टिवल. हा फेस्टिवल दरवषीर् इस्टरच्या वेळी साजरा केला जातो.

अ‍ॅम्स्टरडॅम


अ‍ॅम्स्टरडॅम ही नेदरलँड्स देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे, हे अम्सेल नदीच्या काठावर वसलेले आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात नूर्द-हॉलंड ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅम्स्टरडॅम शहर उत्तर समुद्रासोबत एका २५ किमी लांब कृत्रिम कालव्याद्वारे जोडले गेले आहे. २०१० सालच्या अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. आजच्या घडीला नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅम्स्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता. येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅम्स्टरडॅमचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. अ‍ॅम्स्टरडॅम शहर नेदरलँड्सच्या पश्चिम भागात नूर्द-हॉलंड ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅम्स्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.
१७व्या शतकात अ‍ॅम्स्टरडॅमच्या रचनेसाठी सखोल संशोधन करून मोठी योजना बनवण्यात आली ज्याअंतर्गत येथे कृत्रिम कालवे खणले गेले, तसेच नैसर्गिक पाण्यात भराव घालून कृत्रिम जमीन उभारली गेली. १६५६ सालापर्यंत चार गोलाकृती आकाराचे कालवे तयार झाले होते. कालव्यांचा उपयोग पुरापासून संरक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक इत्यादी कारणांसाठी केला गेला. अ‍ॅम्स्टरडॅममधील बहुसंख्य ऐतिहासिक इमारती व वास्तू ह्या कालव्यांच्या भोवताली बांधल्या गेल्या आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढत्या लोकसंख्येमुळे अ‍ॅम्स्टरडॅमला जागेची टंचाई जाणवू लागली. ह्यावर उपाय म्हणून नवी उपनगरे वसवली गेली.
 नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, भुयारी रेल्वे व ट्राम सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्वाचा वाहतूक प्रकार आहे.सायकल हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक वाहन वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.

अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल हा नेदरलँड्समधील सर्वात मोठा तर युरोपातील पाचवा सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.
जेव्हा न्युयोर्क शहराचा शोध लावला तेव्हा त्याला पहिले नाव हे न्यू अ‍ॅम्स्टरडॅम असे दिले होते.
 अ‍ॅम्स्टरडॅमला 'कालव्यांचे शहर' म्हणतात. अर्धचंद्राकृती अनेक कालव्यांना छेदून जाणाऱ्या अन्य कालव्यांच्या दोहो बाजूंना रस्ते व रस्त्याच्या कडेला झाडे व झाडांच्या आडोशाला घरे असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. अ‍ॅम्स्टरडॅममधील कालव्यांची लांबी सु. ८० किमी. असून त्यांमुळे बनलेल्या बेटाची संख्या ७० आहे. सुलभ संचारासाठी कालव्यांवर बांधलेल्या पुलांची संख्या ५०० आहे. हेरेन, कैसर, प्रिन्सेन या प्रमुख कालव्यांच्या घाटांवर पूर्वी श्रीमंत व्यापाऱ्यांची निवासस्थाने होती. आता तेथे बँका, कचेऱ्या, संग्रहालये आहेत. वास्तुशिल्पाच्या दृष्टीने या इमारती अभ्यसनीय आहेत.


जोर्दान या मजूरवस्तीत १७ व्या शतकातील वेस्टरकर्क हे प्रसिद्ध चर्च आहे. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील मजूरवस्त्या गलिच्छ असल्या, तरी अलीकडील नव्या वस्त्यांची आखणी व रचना आदर्श असल्याने शहररचनेच्या बाबतीत अ‍ॅम्स्टरडॅमची ख्याती आहे.पुर्वी अ‍ॅम्स्टरडॅम लहानसे मच्छीमारी खेडे होते. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी त्याला शहराचा दर्जा मिळाला. यावर काही काळ हॅन्झाएटिक संघाचा प्रभाव होता. धर्मसुधारणेच्या चळवळीने प्रभावित होऊन येथील बहुसंख्य लोकांनी प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारला. स्पेन, पोर्तुगाल आदी देशांतील संकुचित धार्मिक धोरणाला व तदंगभूत छळाला कंटाळून तेथील कित्येक कारागीर अ‍ॅम्स्टरडॅमला येऊन राहिले. त्यांतील हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या अनेक कारागिरांनी येथे आपले बस्तान बसविल्यापासून अ‍ॅम्स्टरडॅमचा हा एक प्रमुख व्यवसाय झाला. १६४८ च्या वेस्टफेलियाच्या तहाने स्केल्ट नदीवरील व्यापाराला प्रतिबंध पडल्याने अँटवर्पचे महत्त्व घटून अ‍ॅम्स्टरडॅमचे वाढले. सतराव्या शतकाच्या अखेरीस डच ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर अ‍ॅम्स्टरडॅमची भरभराट झपाट्याने झाली. यूरोपातील एक मोठे बंदर म्हणून ते ओळखले जाऊ लागले. फ्रेंचांच्या अल्पकालीन राजवटीत नेपोलियनने राजधानीच येथे नेली व १८१४ च्या संविधानाने ती कायम झाली. प्रत्यक्षात मात्र मंत्रिमंडळाचा शपथविधी, राज्यारोहण वगैरे औपचारिक प्रसंग सोडता राजधानीने अन्य व्यवहार हेगहून चालतात.


अ‍ॅम्स्टरडॅम बंदराचा व्यवहार प्रचंड आहे. सालीना सु. ७,००० बोटी येथे ये-जा करतात. डच साम्राज्यातील विविध देशांमधून कोळसा, अशुद्ध धातू, धान्य, पेट्रोल, तंबाखू, चहा, कॉफी, कोको, तेलबिया, इमारती लाकूड यांची आयात व दुग्धपदार्थ, कागद, कृत्रिम खते, साखर यांची निर्यात या बंदरातून होते. येथील शेअरबाजार जुना व जगप्रसिद्ध आहे. येथे विमाकंपन्या, बँका आदींच्या मुख्य कचेऱ्या व अंतर्गत व्यापाराची पेठ असल्याने आर्थिक घडामोडींचे केंद्र म्हणून अ‍ॅम्स्टरडॅमला महत्त्व आहे. दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी असूनही सायकलींचे प्रमाण येथे फार मोठे आहे.


अ‍ॅम्स्टरडॅम औद्योगिक शहर आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या येथील व्यवसायाला जागतिक महत्त्व आहे. लोखंड, रंग, रसायने, साबू, तेल, खाद्यपदार्थ, कागद, कातडीकाम, साखरशुद्धी-कारखाने, जहाजबांधणी, गोद्या, मुद्राक्षर-ओतशाळा, ग्रंथ-प्रकाशन आदींना औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थान आहे. १९५० मध्ये औद्योगिक कामगार दीड लाखांवर होते. त्यांपैकी २५ टक्के स्त्रिया होत्या.


नेदर्लंड्च्या सांस्कृतिक जीवनात अ‍ॅम्स्टरडॅमला विशेष महत्त्व आहे. चित्रकार हॉबेमा, कोनिंक कुटुंब, व्हेल्डे कुटुंब व तत्त्वज्ञ स्पिनोझा, यांचे हे जन्मस्थान, तर सुप्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रँटची ही कर्मभूमी असल्याने त्याच्याशी निगडित असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममधील वास्तू यात्रास्थानेच बनल्या आहेत. नेपोलियनने १८०८ मध्ये स्थापलेल्या येथील राष्ट्रीय संग्रहालयात रेम्ब्रँटची व अन्य चित्रकारांची प्रसिद्ध चित्रे आहेत. येथील महानगरपालिकेचे संग्रहालय (यात व्हान गॉखचा चित्रसंग्रह आहे), रेम्ब्रँटच्या निवासस्थानातील संग्रहालय व अन्य संग्रहालयेही प्रसिद्ध आहेत, १६३२ मध्ये स्थापन झालेल्या अकादमीचे १८७६ मध्ये विद्यापीठात रूपांतर झाल्यापासून उच्च शिक्षण व संशोधनक्षेत्रातही अ‍ॅम्स्टरडॅमला मोलाचे कार्य होते. शहराजवळ अलीकडे ‘बॉस प्लॅन’ नावाचे कृत्रिम वन तयार करण्यात आल्याने शहराच्या शोभेत भर पडली आहे.


अ‍ॅम्स्टरडॅममध्ये नव्याजुन्याचा सुंदर मिलाफ झालेला असून, १५-१६ व्या शतकातील न्यू कर्क हे गॉथिक चर्च, १७ व्या शतकातील राजवाडा, १४ व्या शतकातील जुने चर्च, १६ व्या शतकातील नगरभुवन वगैरे वास्तुकलेचे ऐतिहासिक नमुने शहराच्या आकर्षणात भर घालतात.दु सऱ्या महायुद्धातील जर्मन बाँबहल्ल्यांमुळे अ‍ॅम्स्टरडॅमला बरीच झळ पोहोचली. पण झालेले नुकसान युद्धोत्तर काळात योजनाबद्ध रीतीने भरून काढून शहराचे सौंदर्य वाढविण्यात आले आहे. ‘यूरोपातील एक अग्रगण्य व्यापारी व औद्योगिक शहर आणि कलेचे माहेरघर’ अशी आजही अ‍ॅम्स्टरडॅमची ख्याती आहे.
असो अशे बरेच शहर हि नद्यांच्या तीरावर वसलेली आहेत. तर अशा प्रत्तेक शहराचे कोणत्या न कोणत्या नदीशी नाते जुळलेले आहे, जरी हि शहरे आणि तेथील नद्या वेग वेगळ्या असल्या तरी कुठे न कुठे त्या समुद्राला जाऊन मिळतातच, तसेच हि सर्व शहरे, नद्या एकमेकांना जरी जोडलेल्या नसल्या तरी मानवीय मनाच्या व विचारांच्या नदीने हि शहरे एकमेकांना जोडलेली आहेत, जिथे नवीन विचारांचे, संस्कृतीचे, कलेचे, विज्ञानाचे मंथन सदा सुरु असते, या मंथनातून मग कधी इंटरनेट व नवीन नवीन शोधासारखे अमृत बाहेर पडते तर कधी गुटखा, दारू सारखे हला-हल, तर कधी लादेन सारखे राक्षस डोके वर काढतात, पण या नदीच्या प्रवाहावर असा बांध घालणे त्यांना शक्य होत नाहीत अथवा त्या अमृताचा लाभ त्यांना घेता येत नाही, कारण या प्रवाहाला, या मंथनाला "प्रत्यक्ष" दिशा देणारा असतो "तो" मार्गदर्शक.