Saturday, July 12, 2014

पाऊस , फिफा आणि फायनल

पाऊस , फिफा आणि फायनल

पावसाळा  म्हणले कि आठवतो मातीचा सुगंध, चिखल -  चिक चिक, छत्र्या, रेनकोट, कोणाला कांदा भजी , तर कोणाला त्ट्रेकिंग . मला मात्र मागच्या वर्षीचा प्रत्यक्ष मधल्या पावसावरील कवितांचा पाऊस आठवतो जो ऑक्टोबर उजाडला तरी संपत नव्हता. शेवटी माझी मागच्या वर्षातली एक कविता "त्या" पावसाळ्यातून "आताच्या" पावसाळ्या पर्यंत लांबली गेली.  असो, माझ्या आजच्या लेखांकनाची  सुरुवात पावसा पासून करण्याचे कारण म्हणजे, जसे पावसामुळे खूप जणांना बऱ्याच  गोष्टी आवडतात तस मला आणखीन एक गोष्ट आवडते ती "फुटबॉल" खेळायला, वर धो धो पावूस कोसळत असताना चिखला मध्ये फुटबॉल खेळायची मजा काही निराळीच, हो ना ! मग त्या चिखला मध्ये मनसोक्त लोळून, तो  चिखल दुसर्यांवर येथेच्छ उडवून (कोणाच्या अंगावर पांढरा कपडा दिसता काम नये) मग लपून छपून घरी यायचे, आणि मग आईच्या हातचा मार आणि बोलणे खायचे. आख्या पावसाळ्यातला  शनिवार आणि रविवार  असाच निघून जायचा.
भारता मध्ये फुटबॉल हा एक सीजनल (ठराविक काळात जास्त खेळणे) खेळा सारखा खेळला जातो, देशाचा काही ठराविक भाग जसे पूर्वोत्तर भारत सोडला तर बाकी देशात या खेळास एवढी पसंती नाही. कदाचित याला असंख्य गोष्टी कारणीभूत असू शकतात (या कारणात मला क्रिकेट चा उल्लेख करावयाचा मोह आवरत नाही). एक नवल मात्र वाटते कि एवढा मोठा देश पण या खेळा  मध्ये आपले प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर विशेष असे नाही. मला फक्त एक खेळाडू आठवतो , तो म्हणजे "बाईचुंग भुतिया". काही वैयक्तीक संघ पण आठवतात जसे गोव्याचा साळगावकर, बंगालचा मोहन बगान. या व्यतिरिक्त जास्त माहिती मला कोणी विचारली तर मात्र मी नक्की गुगल ची मदत घेनार.

विश्वचषक २०१४ 

सध्या ब्राझील या देशामध्ये या खेळाचा महाकुंभ अर्थातच विश्वचषक स्पर्धा सुरु आहे, आणि माझ्या "मित्राच्या" कृपेने मला यावेळेस प्रत्तेक म्याच टी.व्हि.  वर बघायला मिळत आहे. फुटबाल हा खेळ पूर्णतः ड्रिबलिंग आणि पासिंग वर अवलंबून आहे.'जवळच्या पास्सेस'च्या जोरावर तर स्पेन ने २०१० चा विश्व चषक जिंकला होता. आजच्या फुटबाल मध्ये खेळा व्यतिरिक्त  विरुद्ध संघाच्या मुख्य खेळाडूंना  ब्लॉक  करण्यावर संघाचा जोर असतो . यामुळे मग या खेळात आक्रमकता वाढली जाते आणि मग वाद निर्माण होऊन लाल अथवा पिवळे कार्ड पंचांकडून दाखवले जातात. 
यंदाच्या विश्वचषकातील प्रत्येक संघ प्रत्येक सामन्यात नव-नव्या फॉर्मेशननुसार खेळत आहे. हॉलंडने स्पेनला 5-1 ने पराभूत केले तेव्हा या सामन्यात हा संघ 3-4-3 च्या फॉर्मेशननुसार खेळत होता. यंदा 4-4-2 चा फॉर्मेशनही ब-याच संघांनी अवलंबला आहे. बहुतांश संघ दोन स्ट्रायकरसह खेळत आहेत. बहुतेक वेळा तर संघ सामना सुरू असताना फॉर्मेशन बदलताना दिसून येत आहेत. मागच्या विश्वचषकात बहुतांश वेळा 4-2-3-1 आणि 5-4-1 चा फॉर्मेशन दिसला होता. त्या वेळी संघ अतिरिक्त डिफेंडरसह खेळत होते. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकूण 20 सामन्यांत 60 गोल झाले आहेत. प्रत्येक सामन्यात सरासरी 3.14 गोलच्या सरासरीने दर अर्ध्या तासाला यातील एक गोल झाला आहे. 1958 नंतर प्रथमच अशी सरासरी दिसली आहे. त्या वेळी 3.6च्या सरासरीने 126 गोल झाले होते. मागच्या विश्वचषकात ही सरासरी 1.64 इतकी होती.
फुटबाल हा एक सांघिक खेळ आहे , परंतू प्रत्तेक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरी कडे युरोप मधले वेग वेगळे क्लूब नजर लावून बसलेल असतात आणि जो सर्वात छान  कामगिरी करेल त्याला करार बद्ध करण्या साठी रीघ लागलेली असते. मग  पावसाला लाजवेल असा पैस्यांचा पावूस त्यांच्या वर पाडला जातो. आपल्या कडल्या  आई पी एल चे उगम स्थान म्हणजे हि फुटबाल क्लब आहेत.
प्रत्तेक विश्वचषका प्रमाणे या विश्वचशका मध्ये सुद्धा काही खेळाडू  हे जास्त प्रकाशात आहेत, त्यात सर्वात वर आहे आर्जेन्टिना च मेस्सी, ब्रासील चा नेइमार , हॉलंडचा रोब्बीन . यावेळेस जर्मनीने त्यांच्या सर्वात अनुभवी खेदाडू क्लोसे याला दुसर्या फेरी मध्ये मैदानात उतरवले.  यावेळेस गोल्डन बूट चा मानकरी James RODRIGUEZ हा ६ गोल करून आघाडी वर आहे परंतु थोमस मुल्लर या जर्मनी च्या खेडाडू कडे आणखीन कमीत कमी एक मच व जास्तीत जास्त २ मच शिल्लक असल्यामुळे तो त्याच्या सध्याच्या ४ गोल मध्ये आनखिन गोल वाढवू शकतो.  फिफाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत गोलची 49 वी हॅट्ट्रिक नोंदवल्या गेली. ही उल्लेखनिय कामगिरी जर्मनीच्या थॉमस मुल्लरच्या नावे नोंदवल्या गेली. यासह त्याने जर्मनीच्या विजयातही मोलाचे योगदान दिले. अमेरिकेच्या जमाई थी बर्ट पाटेन्योडने 1930 मध्ये वर्ल्डकपमध्ये पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्यानंतर 1954 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक आठ हॅट्ट्रिकची नोंद करण्यात आली. जर्मनीच्या नावे सात हॅट्ट्रिक आहे. इंग्लंडचा जियोफ हस्र्ट हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने फायनलमध्ये हॅट्ट्रिक केली होती. जी ग्रुपच्या आपल्या पहिल्या सामन्यात जर्मनीने रोनाल्डोच्या बलाढय़ पोतरुगालचा 4-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. याशिवाय जर्मनीने वल्र्डकपच्या सलामी सामन्यातील आपल्या विजयाचीही परंपरा कायम ठेवली. हा र्जमनीचा सलामी लढतीचा 13 वा विजय ठरला.
हा लेख दुसर्या फेरी मधल्या शेवटची लढत सुरु असताना लिहायला घेतला, तेव्हा  बेल्जिअम ने हि लढत २-१ ने जिंकली होती. आता उस्तुकता फारच वाढली होति. शेवटचे ८ बलाढ्य संघ उप -उपांत्य फेरी साठी सज्ज झालेले आहेत. ब्राझील-कोलंबिया , फ्रान्स- जर्मनी , हॉलंड-कोस्टा रिका , आर्जेन्टिना,-बेल्जिअम अश्या लढती साठी सर्व प्रेक्षक सज्ज झाले आहेत आणि अपेक्षे प्रमाणे ब्रासील, जर्मनी , अर्जेन्टिना , हॉलंड सेमी फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. विश्व चषकाचे प्रबळ  दावेदार म्हणून जर्मनी  आणि हॉलंड कडे बघितले जात आहे.

"ते" ७ मिनिट 

ब्राझील संघाला घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा आहे परंतु ब्रासील चा नेय्मार उप उपांत्य फेरी नंतर दुखापती मुळे  विश्वचशकातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे आता ब्रासील समोर जर्मनी  सारख्या संघाला समोर जाण्याचे आव्हान उभे ठाकले होते. ब्रासील आपल्या स्टार खेळाडू शिवाय सेमी फायनल खेळला. अनपेक्षितरीत्या ७-१ ने ब्राझील हा सामना हरला. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला मुल्लर ने गोल करून जर्मनीला आघाडी मिळवून दिली आणि पुढच्या ६ मिनिटा  मध्ये जर्मनी  ने ब्राझील ची सरंक्षण फळी भेदत ४ गोल केले. पहिल्या ३० मिनिटा मध्ये ब्राझील एका मानसिक दडपण खाली आले जे शेवट पर्यंत कायम रहिले. आणि इतिहासातल्या सर्वात लाजीरवाण्या पराभवाला सामोरे गेले. स्टेडीअम  मध्ये भयाण शांतता पसरली होति.
जर्मनी  नावाच्या स्तुनामीने ब्राझीलला आपल्या कवेत कधी घेतले आणि साफ केले हे विचार करण्याच्या आत ब्राझील संघ पुरा नेस्तनाबूत झालेला होता. परंतु हा ब्राझील च्या जनतेचा खिलाडू पण, त्यांनी थोड्या वेळातच सत्य स्वीकारले आणि स्टेडीअम  मधले प्रेक्षक चांगल्या खेळाला पाठींबा देऊ लागले. हा ब्राझिलियन लोकांच्या खिलाडूवृत्तीचा एक छान  नमुना होता. प्रत्तेक विश्व्चषक मध्ये नवीन नवीन विक्रम नोंदवले जात असतात. या वेळेस जर्मनी  च्या क्लोसे ने एकूण १६ गोल विश्व चषक स्पर्धेमध्ये करून  एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. ब्राझील चे कोच  स्कोल्लारी यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. "त्या" ७ मिनिटाने ब्राझील ची दयनीय स्थिती करून ठेवली होति. कदाचित यावेळेस स्कोल्लारींना नक्की काका हा त्यांचा स्टार खेळाडू आठवला असेल, ज्याला त्यांनी विश्व चषकासाठी साठी डावलले होते.

प्रत्तेक देशाच्या बाबतीत नवीन काही न काही तरी घडत असते. या वेळेस अर्जेन्टीना २४ वर्षानंतर सेमी फायनल मध्ये गेला आहे. तर जर्मनी  सलग ४ वेळेस. दुसऱ्या  एका सेमीफायनल मध्ये आर्जेन्टिना ने हॉलंड सारख्या बलाढ्य टीमला पेनल्टी शूट ऑउट मध्ये हरवले, आणि फायनल मध्ये प्रवेश केला.
आता तिसऱ्या  स्थाना साठी ब्राझील व हॉलंड मध्ये लढत होइल. कदाचित  हा माझा लेख प्रकाशित होइ पर्यंत फायनल मच झालेली असेल किंवा आज फायनल लढत (जर्मनी वि. अर्जेन्टीना)  होइल.


सोन्याच्या नाण्याच्या खाणी मधले कामगार- फुटबाल खेळाडू

आपल्या कडे खाणी मधले कामगार म्हणले कि सगळ्यांना आठवते कोळस्याची खान आणि त्यात काम करणारे काळ्या रंगाने सजलेले कामगार.  इथे मुद्दाम फुटबाल खेळाडूंना खाणी मधले कामगार अशी उपमा देत आहे, आणि फिफा संस्थेला खान मालक हि. फोर्ब्स २०१४ च्या श्रीमंत खेळाडूंच्या यादी मध्ये ७ फुटबाल खेळाडू पहिल्या २० मध्ये आहेत. २ नंबर ला आहे पोर्तुगाल चा रोनाल्डो ज्याचे उत्पन्न आहे ८० मिलियन अमेरिकन डॉलर(अंदाजे ५०० कोटी रु ) त्या नंतर मेस्सी ४ नंबर ला आहे. म्हणजे आता जर विचार करा खाणी मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे उत्पन्न असे असेल तर खान मालक या पैसा उत्पन्नाच्या कुठल्या स्तरावर असतील. 

फिफा - सोन्याच्या नाण्याचे  खान मालक 
फिफा नावाची जागतिक संस्था या स्पर्धेचे आयोजन करते. ऐक गमतीदार भाग असा कि फिफा या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे सदस्य देश हे युनोच्या सदस्य संख्येपेक्षाही जास्त आहेत. या स्पर्धे मध्ये  जगातील ३२ संघ भाग घेऊ शक्तात. प्रत्तेक खंडा मधून कमीत कमी २ संघ तरी या स्पर्धेसाठी पात्र होतात. जगातील सर्वात जास्त देशामध्ये खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. फिफा या संस्थेला सोन्याची खान हि उपमा का दिली कारण फिफाला विश्वचषकातून 4.5 अब्ज डॉलर्सची कमाई होण्याची शक्यता आहे. फिफाला या उत्पन्नासोबतच यजमान देशाकडून कर सवलतही मिळत असते. या मुळे ब्राझीलला सुमारे 248.7 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. २014 च्या फिफा विश्वचषकासाठी वापरण्यात येणारे फुटबॉल हे खास पाकिस्तानच्या सियालकोट येथील ख्वाजा मसूद अख्तर यांच्या फॅक्टरीत बनवलेले हातशिवणीचे फुटबॉल असणार आहेत. फिफाने ह्या विश्वचषकासाठी 6 हजार फुटबॉलची ऑर्डर मसूदना दिली होती.

सोन्याच्या नाण्याची पहिली बाजू 

मनुष्याने कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चे मध्ये राहावं, त्यामुळे तो प्रसिद्धीस येतो. परंतु ते कारण चांगले असावे, असे तरी मला वाटते. आता प्रत्तेक विश्व चषक (मग तो क्रिकेट चा असो अथवा आणि कोणता,)  मध्ये काही न काही तरी विचित्र घडत असते. मग ती भज्जीची श्रीशांतच्या श्रीमुखात लावलेली थापड असो अथवा जावेद मिआदाद च्या माकड उड्या. फुटबाल हा खेळ बघितला कि मला एक गोष्ट चांगलीच पटते ती म्हणजे क्रिकेट ला जेंन्टलमेन चा खेळ बोलले जाते. २००६ चा जर्मनी मधला फुटबाल विश्वचषक बर्याच जणांना आठवत असेल. तो एका  गोष्टींमुळे चर्चेत राहिला होता . 2006 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेवेळी दिग्गज फुटबॉलपटू जिनेदिन जिदान वादात सापडला होता. या स्पर्धेच्या फायनलच्या लढतीत त्याने इटलीच्या माताराझ्झीच्या छातीवर डोक्याने जोरदार प्रहार केला होता. त्या वेळी जिदानला रेड कार्ड दाखवण्यात आले. या रेडकार्डसोबतच त्याची कारकीर्दही संपुष्टात आली. त्यानंतर लगेच त्याने निवृत्ती घोषित केली. दोहामध्ये या घटनेवर आधारित एक कांस्याची मूर्ती स्थापण्यात आली होती. या शिवाय इटलीच्या फ्रांसेस्को तोत्ती चे युरो कप मधले प्रतिस्पर्धी खेडाडू च्या अंगावर थुंकणे. याला मानसिक विकृती सुद्धा आपण म्हणू शकतो.

आता बघा न यावेळेस चा विश्व चषक खेळा पेक्षा पण जास्त चर्चेत राहिला तो उरुग्वेच्या सुआरेझ  च्या चावण्या मुळे. आता त्याची हि पहिली वेळ नव्हती. लुईल सुआरेजने मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील एका फुटबॉलपटूला चावा घेतत्यानंतर जगभरातील फुटबॉल फॅनने त्याच्यावर विविध माध्यमातून टिका करायला सुरुवात केली आहे. मग नेटिझन्स याठिकाणी मागे कसे राहतील. विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर विविध प्रकारे लुईसची टिंगल टवाळी सुरू आहे.2013 मध्ये लीव्हरपूल येथील इव्हानोविचला चावा घेण्याच्या घटनेनंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. टॉम फॅकेट यांनी ‘सुआरेज पुन्हा चावा घेईल’, अशी भविष्यवाणी केली होती.आयुष्यातील दुर्बलता हे यामागील कारण आहे, असे ते म्हणाले होते. गरीबीत 7 भावंडांमध्ये वाढलेल्या सुआरेझने कायमच अस्तित्वासाठी संघर्ष केलाया सर्व गोष्टींमध्ये सर्वात गमतीदार बाब अशी कि त्या खेलाडूंच्या अशा चुकीला पाठीशी घातले जाते. सुआरेझ ने केलेल्या त्या प्रकारामुळे फी फा ने त्याच्यावर ३ महिन्यांची बंदी घातली. पण हि गोष्ट म्हणे उरुग्वेच्या राष्ट्र्धयाक्षांना खटकली. त्यावर विचित्र गोष्ट म्हणजे सुआरेझ चे त्यांच्या देशात जोरदार स्वागत झाले.
फुटबॉलच्या मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाद घालण्यात पटाईत असलेला पोर्तुगालचा डिफेंडर पेपेवर लवकरच बंदी लागण्याची दाट शक्यता आहे. जर्मनीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने मुल्लरच्या डोक्यावर प्रहार करून नवा वाद उद्भवून घेतला. सामन्याच्या 36 व्या मिनिटाला मुल्लर जमिनीवर कोसळला असताना पेपेने त्याच्या डोक्यावर डोक्याने प्रहार केला. या घटनेमुळे पंचाने लगेच पेपेला रेड कार्ड दाखवून मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्या शिष्टाचार समितीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून त्याच्यावर एकूण तीन सामन्यांची बंदी घालण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पोर्तुगालच्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या पेपेचे नाव पहिल्यांदाच वादाशी जोडल्या गेले नसून यापूर्वीही त्याने अशाप्रकारचे अनेक वाद ओढवून घेतले आहे. म्हणूनच फुटबॉलच्या मैदानात विवादाचे दुसरे नाव म्हणजे पेपे’ अशी त्याची ख्याती पसरली आहे. मागे खेळलेल्या सामन्यातच नव्हे तर यापूर्वीच्या अनेक लढतीत तो वादात अडकला आहे
कदाचित अशाच कारण मुले प्रत्तेक संघ त्यांच्या सोबत प्रशिक्षका सोबत फिटनेस कोच व्यतिरिक्त एक मानसोपचार तज्ञ पण ठेवतात.

फुटबॉल विश्‍वचषक बाझील २०१४ - एक विरोधाभास (सोन्याच्या नाण्याची दुसरी बाजू )

बाझीलच्या नागरिकांसाठी फुटबॉल जीवापेक्षाही अधिक प्रिय आहे. सध्‍या फुटबॉल विश्‍वचषक ब्राझीलमध्‍ये चालू आहे. स्टेडियमपासून रस्त्यांपर्यंत लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. ब्राझील आणि फुटबॉल असे एक जुने समीकरण आहे. या कारणामुळे संपूर्ण ब्राझील फुटबॉलच्या रंगात रंगून गेला आहे आणि या व्यतिरिक्त येथे काही घडतच नाही, असे दिसत आहे. स्टेडियमध्‍ये येणा-या प्रत्येकजणाचा आनंद हा द्विगुणीत होत आहे. तसेच रस्त्यावरील आणि घरांमध्‍ये फुटबॉल सामने पाहाणा-या प्रेक्षकांचाही आनंद कमी नाही.घर, कार्यालय, हॉस्पीटल किंवा रस्ता असो प्रत्येक ठिकाणी लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर लोकांच्या नजर खिळून राहिल्या आहेत. ब्राझील व्यतिरि‍क्त मे‍क्सिको, जर्मनी आणि व्हेनेझुएलासारख्‍या देशातही लोक फुटबॉल विश्‍वचषकाचा आनंद घेताना दिसत आहेत.ब्राझीलने यापूर्वी 1950 मध्येही विश्वचषकाचे यजमानपद भूषविले होते. ब्राझीलच्या नावे एकूण 5 विश्वविजेतेपदं जमा असून फुटबॉल आणि ब्राझील यांचे एक वेगळेच अतूट नाते आहे. असे असताना हा विरोधाभास पहा, सारे जग विश्वचषकाच्या आनंदोत्सवात झिंगत असताना यावेळच्या यजमान देशात मात्र जनतेच्या आयुष्याच्या गाडीला  राजकिय अस्थिरतेची, येऊ घातलेल्या आर्थिक मंदीची ठिगळं जोडली जाताहेत. तरीही तिथे विश्वचषकाचा बाजार भरवला जातोय. त्यामूळे ब्राझिलची जनता क्षुब्ध आहे. ब्राझिलियन जनतेला भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांच्या काळ्या सावलीने विश्वचषकाची रंगीन नवलाई झाकोळलेली दिसते आहे. गतिशून्य अर्थव्यवस्था, वाढीसाठी महागाई आणि बेकारी  यामुळे अवघड होत चाललेले जगणे, सध्या सामान्य ब्राझीलवासींना भेडसावत असून आमच्या पायाभूत सोयीसुविधा महत्त्वाच्या की महिन्याभराचा हा उत्सव अधिक महत्त्वाचा असा या जनतेचा प्रश्न आहे. तो गैर म्हणता येणार नाही. याचे कारण असे की ब्राझीलच्या राजधानीच्या व इतर  शहरांच्या नियोजनासाठी, शहराच्या पायाभूत सुविधांसाठी खर्चावयास ब्राझील सरकारकडे पैसे नाहीत पण  या विश्वचषकासाठी मात्र तब्बल हजारो कोटी रुपयांची तरतुद या सरकारने केली आहे. यामुळे जनतेत संताप आहे. गेले तीन महिने याच संतापाचा उद्रेक होताना दिसतो.त्यात भर म्हणून कि काय ब्राझीलच्या लाजिरवाण्या पराभवामुळे या संतापात आणखीनच भर पडलेली दिसत आहे. ब्राझील चा हा पराभव म्हणजे आता एका राष्ट्रीय चर्चेचे निमित्त बनलेले आहे. ब्रिक्स या नावाने ओळखल्या जाणार्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देश समूहात एके काळी चीनच्या खालोखाल अर्थव्यवस्थेच्या मानाने ब्राझीलचे स्थान होते. ते स्थान या देशास आता राखता आलेले नाही.
आपण भारतीयांना वाटते भ्रष्टाचार फक्त आपल्याच देशात आहेत, परंतु या भ्रष्टाचाराच्या झाडाची मुळे खोलपर्यंत सगळ्या जगात दूरवर पोहोचलेली आहेत. जिथे पाणी असते तिथे जीवन आहे,या प्रमाणे जिथे पैसा आहे तिथे भ्रष्टाचार असणारच, हा  'थंब  रूल'. त्यात फिफा सारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवायचे तर कोणी ठेवायचे आणि निरीक्षण करायचे तर कोणी . असो या भ्रष्टाचाराच्या झाडाची मुळे आपण शोधत
बसलो तर आपल्याला एक जन्म पुरणार नाही. एक गोष्ट मात्र मला पटते,  नेहमी प्रमाणे साधारण जनता या भ्रष्टाचाराच्या आगी मध्ये होळपली  जाते.

- अभिजीत अरुण जोशी , निगडी -पुणे

No comments:

Post a Comment